अजित पवार गटाच्या उत्तरदायित्व सभेत शरद पवार ‘टार्गैट’!  घोषणांचा पाऊस अन मुश्रीफांचा उदो उदो

कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर अजित पवार आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची रविवारी सभा झाली. आमचे उत्तरदायित्व सामान्य जनतेशी आहे, महाराष्ट्राच्या विकासाशी आहे असे सांगण्याचा प्रयत्न या सभेत करण्यात आला. पण सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनाच अप्रत्यक्षपणे टार्गैट केले होते . तर आपला भाषणात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस पडला आणि हसन मुश्रीफाचा उदो उदो केला.

    दीपक घाटगे , कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर अजित पवार आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची रविवारी सभा झाली. आमचे उत्तरदायित्व सामान्य जनतेशी आहे, महाराष्ट्राच्या विकासाशी आहे असे सांगण्याचा प्रयत्न या सभेत करण्यात आला. पण सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनाच अप्रत्यक्षपणे टार्गैट केले होते . तर आपला भाषणात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस पडला आणि हसन मुश्रीफाचा उदो उदो केला.

    कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात भरघोस आश्वासने या सभेत देण्यात आली. पण बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, खाऊनी कोण तृप्त जाहला या म्हणीचे प्रत्यंतर यायला नको अशी कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेची रविवारच्या सभेत दिलेल्या आश्वासनाबद्दलची प्रतिक्रिया आहे.

    आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला, लोकांचा आमच्यावर मोठा दबाव होता, म्हणून त्याचाही विचार केला आणि मग आम्ही सत्तेच्या वर्तुळात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे या सर्वांनी रविवारच्या सभेत पुन्हा सांगितले. हे त्यांना पुन्हा पुन्हा का सांगावेसे वाटते ? त्यांच्या मनात कुठेतरी अपराधी भावना असल्याचे दिसून आले.

    महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तेव्हा शिवसेनेत मोठी फूट पडली. तेव्हा एक नवीन सरकार अस्तित्वात येत असताना आपणही सत्तेत सहभागी होऊया असा आग्रह धरणारे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांच्या सह्यांचे एक पत्र पक्ष नेतृत्वाला दिले होते. हे खोटे असेल तर मी राजकारणातून बाहेर जाईन आणि हे जर खरे असेल तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे आव्हानच अजित पवार यांनी शरद पवारांना दिले आहे. शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी कोल्हापुरात निर्धार सभेत केलेल्या भाषणाला जशास तसे उत्तर देण्यासाठी ही सभा होती. आता कोल्हापुरात उत्तर सभेच्या निमित्ताने आलोच आहोत तर कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा खुश करूया असा विचार करून अजित पवार यांनी शिवाजी विद्यापीठ अमृत महोत्सव, आय.टी. डेस्टिनेशन, अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, सारथी उपकेंद्र, काळमवाडी धरणाची गळती काढणे, तालमींचा जर्णोद्धार करणे, केएमटीला उभारणी देणे अशी काही आश्वासने त्यांनी दिली.

    उच्च न्यायालयाच्या खंडपीठाविषयीही ते काही बोलले नाहीत, हद्दवाढ या विषयावर आश्वासक असे काही बोलले नाहीत. कोणत्याही शहराचा त्याची हद्दवाढ झाल्याशिवाय विकास होत नाही असे त्यांचे यापूर्वीचे मत आहे. हद्दवाढ या विषयावर सर्वांनी एक व्हावे, शहराच्या हद्दवाढीला कुणी विरोध करू नये असे त्यांनी आवाहन केले असले तरी कोल्हापूरच्या विकासासाठी या शहराची हद्दवाढ केली पाहिजे. अशी राज्यकर्ते म्हणून त्यांची कोणती भूमिका दिसून आली नाही .

    करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखडा इसवी सन २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेला आहे. पण गेल्या नऊ वर्षात तो एक इंचानेही पुढे सरकलेला नाही. आता महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत आणि त्या विकास आराखड्याची घोषणा करणारे चंद्रकांत पाटील हेही मंत्री आहेत. पण काहीच घडताना दिसत नाही. अजित पवार यांनी कोल्हापूरच्या सभेत आश्वासने देण्याऐवजी मंजुरीच्या थेट घोषणा केल्या असत्या तर आमचे उत्तरदायित्व सर्व सामान्य जनतेशी आहे, विकास कामाशी आहे हे सिद्ध झाले असते.

    कोल्हापूर शहरवासीयांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी काळम्मावाडी धरण थेट पाईप लाईन योजना जवळपास पूर्ण झालेली आहे. ही योजना अजित पवार यांनी मंजूर केलेली आहे. त्यामुळे या योजनेचे श्रेय अजित पवार यांनाच द्यावे लागेल असे विधान हसन मुश्रीफ यांनी केल्यामुळे एका नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. वास्तविकही पाणीपुरवठा योजना जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष सतेज पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मंजूर करून घेतलेली आहे. मंजुरी पासून ते थेट योजना कार्यान्वित होईपर्यंतच्या प्रक्रियेत सतेज पाटील आहेत. ही वस्तुस्थिती असताना त्यांनी श्रेय वादाचा नारळ का फोडला आहे. मुश्रीफ, सतेज पाटील कोल्हापूरच्या मोठ्या संस्थांमध्ये एकत्र आहेत. अजित पवार यांना श्रेय दिल्यामुळे आता त्यांच्यात विसंवाद होण्याची शक्यता अधिक आहे.

    कोल्हापूरच्या उत्तरदायित्व सभेचे संपूर्ण नियोजन हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. सभेला विक्रमी गर्दी करण्याचे नियोजन ही त्यांच्याकडेच होते. त्यांच्या दाव्यानुसार या सभेला एक लाख लोक उपस्थित नव्हते , पण कर्नाटक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, वगैरे जिल्ह्यातून खास वाहनांमधून लोक या सभेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. अजित पवार यांचे भाषण सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात सभामंडपातील लोक बाहेर उठून जाऊ लागले असल्याचे चित्रही अनेकांनी रविवारी पाहिले. त्यामुळे सभास्थळी असंख्य खुर्चा रिकाम्या दिसत होत्या.