शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार; देवेंद्र फडणवीस यांचा दावा

बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरेयांचा पक्ष ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    पिंपरी : बारामतीची निवडणूक झाल्यानंतर वातावरण बदलल्याचे शरद पवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरेयांचा पक्ष ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरेंद्र मोंदीं शिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. काँग्रेस डुबती नाव आहे. देशासाठी काही करायचे असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पवार, ठाकरेंनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
    शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची भोसरीतील गावाजत्रा मैदानावर शुक्रवारी (१० मे) ‘विजयी संकल्प’ सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदी यावेळी उपस्थित होते.
    देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायतीची नसून ही देशाची निवडणूक आहे. देशाला मजबूत, सुरक्षित, विकासाकडे नेऊ शकतो. सामान्यमाणसांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करु शकता असा नेता निवडण्याची निवडणूक आहे. वेगवेगळ्या पक्षांची मोठ बांधून महायुती तयारझाली. तर, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ पक्ष एकत्र आले. पण, नेता ठरवू शकले नाहीत.
    पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगूच शकत नाही. सकाळी नऊ वाजता येणा-या भोंग्याने पाच वर्षात पाच पंतप्रधान निवडू असे सांगितले. आता देशाचा नेता निवडायचा आहे. इंडिया आघाडीकडे नेता, निती, नियत नाही. मोदी यांना पर्याय नाही. त्यांच्या नेतृत्वात महायुतीमजबूत आहे. तिकडे डब्बे नसून सगळे इंजिन आहेत. त्यात बसायला जागा नाही. शिरुरची बोगी मोदी यांच्या इंजिनला जोडावी. त्यानंतर शिरुरला वेगापासून कोणीच वंचित ठेऊ शकणार नाही.
    खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगले कलावंत, नाटककार आहेत. पण, ते कलाकारच राहिले, खासदार होऊ शकले नाहीत. चोखंदळरसिक एखाद्या नाटकाला पहिल्यांदा तिकीट काढून जातो. दुस-यांदा जात नाही. नाटक ‘फ्लॉप’ झाल्याने कोल्हेंना आता संधी मिळणार नाही. निवडणूक आल्यानंतर निवृत्तीची घोषणा करतात. निवडणूक झाल्यानंतर नाटकच करतात. जनतेला विसरुन जातात. पाच वर्षे कोठे होतात, हे जनता कोल्हेंना विचारत आहे, असेही फडणवीस म्हणाले. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त केली जाईल. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे नियोजन केले आहे. तीन-तीन मजले रस्ते तयार केले जाणार असून, विकास आराखडा तयार झाला आहे. आधुनिक शहर तयार करण्याचा प्रयत्न आहे. रेडझोनचाही प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.