व्हायरल जातीच्या दाखल्यावर शरद पवारांचे परखड उत्तर, म्हणाले, सगळ्या जगाला माहितीये माझी जात कोणती….

  Sharad Pawar PC : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न राज्यभर पेटत असताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त (Diwali Padwa) माध्यमांशी संवाद साधताना सडेतोड उत्तर देत विरोधकांचे तोंड बंद केले आहे.
  सगळ्या जगाला माहितीये माझी जात काय
  जन्माने दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीये माझी जात काय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल  झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा आरक्षणाबाबत बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत. आज दिवाळी पाडव्याचा गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, गेली 50 वर्षे ही पद्धत आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचे वर्ष वेगळे आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी अलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचे वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन.
  मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही : शरद पवार
  मराठा आरक्षणाबाबतही शरद पवारांनी भाष्य केले आहे. मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासनही दिलं आहे. पुढे बोलताना मराठा ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत. लोकांचे न्याय प्रश्न मात्र सुटले पाहिजेत, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पूर्ततेची प्रक्रिया पूर्ण करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.
  सगळ्या जगाला माहितीये माझी जात काय : शरद पवार
  काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहले होते. जन्माने दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीये आहे, माझी जात काय आहे.
  दरम्यान, आज शरद पवारांच्या गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.