अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांसह सर्व पवार कुटुंब उपस्थित होतं. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. या भेटीवर स्वतः शरद पवारांनी अगदी मोजकी प्रतिक्रिया दिली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गटात विभागला गेला. या फूटीनंतर दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर सडकून टीका करत आलेत. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंब दिवाळीनिमित्त उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी एकत्र आले. या भेटीनंतर अजित पवार लगेचच दिल्लीला गेले. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या. या भेटीवर स्वतः शरद पवारांनी अगदी मोजकी प्रतिक्रिया दिली.

    शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांसह सर्व पवार कुटुंब उपस्थित होतं. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जनतेला शुभेच्छा देणारा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अजित पवार आणि इतर कुटुंबियांची भेट घेतल्याचा संदर्भ दिला आहे.

    “सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. अडचणी असतात. वेळेप्रसंगी काही संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. पण आयुष्यात प्रतीवर्षी काही दिवस असे असतात, की या संकटाचं विस्मरण करुन कुटुंबासोबत काही दिवस घालवावेत, जगावं अशा प्रकारची इच्छा असते. अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा आजचा दिवाळीचा दिवस आहे,” असं शरद पवार म्हणाले. या विधानामधून त्यांनी राजकीय मतभेद विसरुन आपल्या कुटुंबियाची भेट घेतल्याचं अधोरेखित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    पवारांनी दिल्या शुभेच्छा

    “उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुढील 2-3 दिवसांमध्ये लोक उत्साहाने सण साजरा करतात. मी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचा सण आनंदाने जावो, त्यांच्या व्यक्तीगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो. पुढच्या आयुष्याचा जो काही कार्यक्रम त्यांनी आखला आहे त्यामध्ये यावर्षी भरभरुन यश येवो, अशाच शुभेच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो,” असं शरद पवार म्हणाले.