शरद पवारांनी ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीअगोदर केली भूमिका स्पष्ट; जाणून घ्या नेमके काय म्हणाले…….

  मुंबई : देशातील प्रमुख विरोधकांची इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक उद्या मुंबईत पार पडणार आहे. तत्पूर्वी आज इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांचे महाविकास आघाडीकडून स्वागत करण्यात आले. विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक (India Meeting) उद्यापासून मुंबईत होत आहे. त्या बैठकीच्या आधी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. उद्याच्या बैठकीत काय होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक वक्तव्य केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या असून, आता आघाडीचा कार्यक्रम ठरणार असल्याची शक्यता पवारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

  या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

  आज झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांना जागा वाटपाबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटले की, इंडिया आघाडीच्या पहिल्या दोन बैठका अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. आता पुढील बैठकींमध्ये इंडिया आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमाबाबत चर्चा होईल. त्यानंतर काही जणांची समिती स्थापन करून राज्यनिहाय स्थानिक पातळीवर आघाडीतील जागांबाबत, इतरांच्या समावेशाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असेही पवार यांनी म्हटले.

  सत्यता असेल तर चौकशी करा

  इंडिया आघाडीतील पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात येतात. त्यावर विचारले असता शरद पवारांनी म्हटले की, भोपाळमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर टीका केली. त्यात त्यांनी महाराष्ट्र बँक आणि इतर घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यांच्याकडे सत्य असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी आणि सखोल चौकशी करावी. फक्त आरोप करू नये, असेही पवार यांनी म्हटले. बहुजन समाज पक्षाच्या मायावती या कोणासोबत जातील, हे पाहावे लागेल. त्यांनी भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले असल्याचेही पवार यांनी म्हटले.

  सामनातील टीका

  ‘दैनिक सामना’तील अग्रलेखातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते याबाबत शरद पवार यांना विचारले. त्यावर माध्यमांनी आमच्यावर टीका केली तर आम्ही काम करणे थांबवावे का, असा उलट प्रश्न केला. तर, पवार यांनी उत्तर देण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो, अशी मिश्किल टिप्पणी केली.