
अखिल मंडई मंडळाच्या श्रीं ची आगमन मिरवणूक मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ओंकार रथातून निघणार आहे. गणरायांची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता ॲड. पराग एरंडे व अनुराधा एरंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या श्रीं ची आगमन मिरवणूक मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ओंकार रथातून निघणार आहे. गणरायांची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता ॲड. पराग एरंडे व अनुराधा एरंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३० वे वर्ष आहे. आगमन मिरवणूक मार्ग अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप असा असणार आहे. यावेळी समर्थ ढोल पथक आणि आवर्तन ढोल पथक ही वाद्य पथके आणि न्यू गंधर्व बँड हे वादन करणार आहेत.
गुरुपरंपरेचे महत्त्व सांगणारी भव्य सजावट -अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदा गुरू परंपरेची महती सांगणारी भव्य सजावट केली जाणार आहे. श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री टेंबे स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज आणि श्री स्वामी समर्थांची १२ फूट भव्य मूर्ती असे गुरू परंपरेचे दर्शन देखाव्यामधून होणार आहे. ६० फूट बाय ८० फूट या भव्यमंडपामध्ये ‘स्वामी दरबार’ हा देखावा उभारण्यात येत आहे.खास हाताने पेंटींग केलेल्या गुरूप्रतिमा व श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती तसेच आकर्षक रंगसंगती व मनमोहक रोषणाई हे देखाव्याचे मुख्य आकर्षण आहे.