Sasan Aya Dari Abhiyan" from Monday in Maval; Read the detailed report

  वडगाव मावळ : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत भेगडे लॉन्स येथे “शासन आपल्या दारी” हे अभियान राबविण्यात येत आहे.

  योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे

  शासन स्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात.सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांसाठी जनजागृती केली जाते.मात्र नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची सविस्तर माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते.यासाठी नागरिकांना कागदपत्रे उपलब्ध करुन देणारी शासनाची कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अनेक कार्यालयात जावे लागते.

  कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर

  तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयांमध्ये जावे लागते.काही वेळा अनेक लोकांना शासनाच्या योजनांची माहिती नसते आणि माहिती असुनही योजनांचा लाभ गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही.त्यामुळे या योजनांचा खरा उद्देश साध्य होत नाही.त्यामुळे या अभियानातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर असणार आहे.

  नागरिकांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी

  या अभियानात महसूल, कृषी, महावितरण,पाटबंधारे, वन विभाग पंचायत समिती, भूमी अभिलेख तसेच महा-ई-सेवा केंद्र तसेच विविध दस्तावेज उपलब्ध करुन देणारे या विभागांचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामसेवक,तलाठी सहभागी होणार असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी होणार आहे.

  शासनाच्या योजना एकाच ठिकाणी

  नागरिकांना अनेक योजनांची माहिती व लाभ मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते.परंतु आता शासनाच्या योजना एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना याचा फायदा होईल.या अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

  शासनाच्या योजनांचा उपक्रमांचा लाभ

  या मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितले की, शासनाच्या योजनांचा उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना तात्काळ मिळावा हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रे सादर करुन गतीने मंजुरी मिळण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली आहे.गरजूंना विविध योजनांचा लाभ सहज मिळवून देणारा हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.