शेगावच्या गजानन महाराज मंदिराची आदर्श कामगिरी, लाऊडस्पीकरला परवानगी असूनही कमी आवाजात होते आरती

शेगावमधील (Shegaon) संत गजानन महाराज मंदिराने (Gajanan Maharaj Temple) इतरांसाठी आदर्श ठरेल, अशी कामगिरी केली आहे. या मंदिराला लाऊडस्पीकरची परवानगी (Loudspeaker Row) असतानाही मंदिरात खूप कमी आवाजात आरती केली जाते.

    सध्या सगळीकडे भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. शिर्डीत (Shirdi) साईंची काकड आरती लाऊडस्पीकरशिवाय होत असल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराला लाऊडस्पीकरची परवानगी मिळण्याची खटपट सुरु आहे. अशातच शेगावमधील (Shegaon) संत गजानन महाराज मंदिराने (Gajanan Maharaj Temple) इतरांसाठी आदर्श ठरेल, अशी कामगिरी केली आहे. या मंदिराला लाऊडस्पीकरची (Loudspeaker Row) परवानगी असतानाही मंदिरात खूप कमी आवाजात आरती केली जाते. परिसरातील इतर धर्मियांना किंवा लोकांना याचा त्रास होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जातेे.

    संत गजानन महाराज मंदिरात वर्षानुवर्षे मंदिरात संत गजानन महाराजांची आरती असो की इतर भक्ती गीते, अतिशय कमी आवाजात आणि लहान स्पीकरवर लावली जातात. सकाळी सात वाजता पहिली आरती होत असते, त्याआधी ५ मिनिटे भक्ती गीते मंद आवाजात मंदिर परिसरात ऐकू येतात. याचा आवाज इतका कमी असतो की भाविकांच्या कानालाही तो सुमधुर वाटतो. आरतीच्या वेळीही आवाजाचे डेसिबल इतके कमी असतात की मंदिरातील आरतीचा आवाजही मंदिराबाहेर ऐकू येत नाही. त्यामुळे राज्यात भोंग्याने घातलेला धुमाकूळ बघता इतर धार्मिक स्थळांनी सुद्धा श्री संत गजानन महाराज मंदिराचा आदर्श घ्यावा, अशी येथे येणारे भक्त सांगताना दिसत आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात दिलेल्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या. ज्याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसल्याचा पाहायला मिळत आहे. साईंची पहाटे होणारी काकड आरती लाऊडस्पीकर विनाच पार पडत आहे. यामुळेच भक्तांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मंदिर प्रशासनाने लाऊडस्पीकरसाठी परवानगी मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. यामध्येच येथील मुस्लीम धर्मीयांनी साईंच्या काकड आरतीला परवानगी द्यावी, त्यासाठी आम्ही पहाटे मशिदीची अजान करणारा नाही, असा अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे.

    शिर्डीच्या साई मंदिरासोबतच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराने देखील काकड आरती आणि धुपारती लाऊडस्पीकर विनाच पार पडत आहे. मंदिर प्रशासनाने आता पोलिसांकडे स्पीकर वापरासाठी परवानगी घेण्याची तयारी सुरु केली आहे.