बारामती वनपरिक्षेत्र कार्यालयावर मेंढपाळांचा मोर्चा ; वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाचा निषेध

मेंढपाळांवर वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी यशवंत ब्रिगेडच्या वतीने मेंढपाळांनी  मेंढ्यांसह बारामती येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

    बारामती : मेंढपाळांवर वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी यशवंत ब्रिगेडच्या वतीने मेंढपाळांनी  मेंढ्यांसह बारामती येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर,  अहिल्या  सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ.  अर्चना पाटील, संपतराव टकले, गोविंद देवकाते, किशोर मासाळ, रवींद्र टकले, वसंतराव घुले, माणिकराव काळे, पाटस गावचे, पुरुषोत्तम ढोणे, यशवंत सेना अध्यक्ष तानाजी कारंडे, सागर देवकाते संभाजी शिंदे राज पाटील, व मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

    बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील मेंढपाळ अनेक वर्षांपासून भटकंती करत आहेत.  स्वतःची शेती नसल्यामुळे पुरेशा चाऱ्या अभावी  गाव सोडून त्यांना मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी   गावोगावी भटकंती करावी लागत आहे.  मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यातील स्थानिक शेतकरी,  टवाळखोर व वनकर्मचारी यांच्याकडून मेंढपाळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी  पारवडी येथे मेंढपाळच्या  लहान मुलीच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. बारामती तालुक्यातील सुपा अभयारण्य  व  वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांकडून मेंढपाळ, महिला, लहान मुले टार्गेट होत आहेत. वन  कर्मचारी मेंढपाळांची बकरी उचलून घेऊन जातात व पैशाची मागणी करतात.  महिलांना धमकावणे, अरेरावी शिवीगाळ करणे असे अनेक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात  आला.