महायुतीच्या नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावरुन जुंपली; शिंदे गटातील आमदारांना रुपाली चाकणकरांचे चोख प्रत्युत्तर

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावले असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावर आता अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘सगेसोयरे’ शब्दासह अधिसूचना काढल्यानंतर अजित पवार गट (Ajit Pawar group) व शिंदे गट (Shinde group) यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी (OBC) समाजाची बाजू मांडत या आरक्षणाला विरोध केला. त्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी छगन भुजबळ यांना खडेबोल सुनावले असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावर आता अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या लढाईमुळे महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

    रुपाली चाकणकर यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट शेअर करत छगन भुजबळ यांची बाजू सावरली आहे. अजित पवार गटातील चाकणकरांनी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांना कडक शब्दांमध्ये सुनावले आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “संजय गायकवाड यांनी मा.ना.भुजबळसाहेब यांच्याबद्दल जे अश्लाघ्य व उर्मट वक्तव्य केले आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते.त्यांच्या सातत्याच्या अशा वक्तव्यांनी बुद्धीहीन वैचारिकतेचे प्रदर्शन मांडले आहे,त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते.असे लोकप्रतिनिधी सभागृहात असणे दुर्दैवच म्हणावे लागेल.तरी मुख्यमंत्री महोदयांनी संजय गायकवाड यांना ‘समजेल’ अशा भाषेत समज द्यावी.” असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.

    काय म्हणाले होते संजय गायकवाड

    एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाही.