Breaking : विधानसभा अध्यक्षांचा शिवसेनेला धक्का; विधिमंडळ कामकाज समितीवर शिंदे गटाचे उदय सामंत, दादा भुसे

शिंदे गटाची विधानसभा कामकाज समितीवर शिंदे गटाची वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे गटाचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाने या समितीवर आपली नियुक्ती व्हावी अशी शिफारस केली होती. पण ती फेटाळून लावण्यात आली आहे.

    मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) १७ ऑगस्टपासून (17 August) सुरु होत असून कामकाजाबाबतचा निर्णय घेण्यात येणाऱ्या समितीत शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दादा भुसे यांचा समावेश करून विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

    विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, संसदिय कामकाज मंत्री, तसेच विधिमंडळातील प्रत्येक पक्षाचा एक सदस्य यांचा या समितीत समावेश असतो. कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिवांकडून पत्र पाठविण्यात आले. मात्र, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना तसे पत्र देण्यात आले नाही. यामुळे चौधरी यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहिले. परंतु, हे पत्र विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावले.

    विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीमध्ये राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची नावे देण्यात आली आहेत.

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

    शिंदे आणि फडणवीस सरकारच्या रखडलेल्या विस्तारामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली असून येत्या १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.