शिंदे गटाचे शिवसेनेला धक्के; नवी कार्यकरिणी जाहीर, १२ खासदारांचा पाठिंबा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार ऑनलाइन उपस्थित होते.

    मुंबई : शिवसेनेला धक्का देण्याचे एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) प्रयत्न सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून जुनी कार्यकारिणी बरखास्त (Dismissed Old Executives) केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, बैठकीला शिवसेनेचे १२ खासदार (MP Support) ऑनलाइन उपस्थित होते.

    शिंदेगटाच्या नेतेपदी रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul); तर उपनेतेपदी उदय सामंत, गुलाबराव पाटील, आढळराव पाटील, विजय नहाटा, यशवंत जाधव यांच्यासह दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गटातील आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या काही खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती होते.

    शिवसेना अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच (NDA) आहे, असा पवित्रा एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या खासदारांनी घेतला आहे. एनडीएच्या सभासदत्वाचा राजीनामा शिवसेनेने दिलेला नाही, अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रिपद सोडले, शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीचा (UPA) घटक नाही, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. दरम्यान, राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, कृपाल तुमाने, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे शिंदे गटात सहभागी आहेत.