ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊत यांच्याकडे असलेलं ‘ते’ पद गेलं; त्यांच्याऐवजी आता…

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळींनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, ठाकरे गटाची बाजू वेळोवेळी भक्कमपणे मांडणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

खासदार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता त्यांच्याऐवजी शिंदे समर्थक असलेले खासदार गजानन कीर्तिकर राज्यसभेचे नवे मुख्य नेते असतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यानंतर आता त्याचे अंतर्गत राजकीय पडसाद पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारीत झाली महत्त्वपूर्ण बैठक

शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची बैठक फेब्रुवारी महिन्यात झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव 21 फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. आता याबाबतची अधिकृत माहिती आज (दि. 23) लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.

मुख्य नेतेपदी वर्णी लागताच सत्कार

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर गजानन कीर्तिकर यांची या पदावर वर्णी लागली. शिवसेना खासदारांनी संसदेतील शिवसेना कार्यालयात गजानन कीर्तिकर यांचा सत्कार केला.