शिंदे-ठाकरे वाद विकाेपाला! शिंदेंच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शाईफेक

राज्यातच्या राजकारणात गेल्या चार-पाच दिवसांपासून घडत असलेल्या घटनाक्रमाने आता टाेक गाठले असून, शिंदेंच्या समर्थनार्थ नाशकात लावण्यात आलेल्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला.

    नाशिक : राज्यातच्या राजकारणात गेल्या चार-पाच दिवसांपासून घडत असलेल्या घटनाक्रमाने आता टाेक गाठले असून, शिंदेंच्या समर्थनार्थ नाशकात लावण्यात आलेल्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. समेटाचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने अाता हा वाद काेणत्या थराला जाईल, याचीच चर्चा सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त हाेताना दिसत आहे.

    शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेना शिंदेंची की, ठाकरेंची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजीदेखील सुरू झाली अाहे. शहरात काही ठिकाणी शिंदेंच्या समर्थनाचे पोस्टर लागलेले होते. या पोस्टरवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या छायाचित्रांसह एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारा आशय लिहिण्यात आला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेल्या शिवसैनिकांनी आज (दि. २४) रोजी आक्रमक पावित्रा घेत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रावर शाईफेक केली. शाईफेकीची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    मुंबईपुरता मर्यादित असलेला विषय आता जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. तसेच मुंबईसह इतर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून समर्थन आणि विरोध केला जात आहे.