रामदास आठवलेंना हवाय शिर्डी मतदारसंघ; महायुतीने दिला नाहीच तर…

केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे शिर्डी लोकसभेची जागा मागितली असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली इच्छा बोलून दाखवली. महायुतीने त्यांच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही, तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नाही, असे आठवले म्हणाले.

  शिर्डी : केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे शिर्डी लोकसभेची जागा मागितली असून, त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली इच्छा बोलून दाखवली. महायुतीने त्यांच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही, तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नाही, असे आठवले म्हणाले.

  भाजपने आणि एकूणच आमच्या एनडीएने ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणूक लढवू द्यावी. मी स्वतः शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्करावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणुक लढवायची आहे, असे ते म्हणाले.

  भाजप आणि मित्रपक्षांची जी काही महायुती झाली ती काही फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सामील झाला म्हणून नव्हे तर आम्ही सुद्धा भाजपमध्ये आहोत म्हणून झाली. भाजपाच्या मित्र पक्षाला आंबेडकरवादी मते पूर्वी मिळत नव्हती. पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली तेव्हा २०१२ पासून ती मते भाजपला मिळू लागली, असा दावा आठवले यांनी केला.

  लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी केली आहे, तर दुसरीकडे रिपाइं महायुतीसोबत आहे. परंतु, यंदाच्या निवडणुकीत रिपाइंला सन्मानजनक जागा हव्या आहेत.

  कमलनाथ भाजपमध्ये

  रामदास आठवले म्हणाले की, अशोक चव्हाण आता भाजपासोबत आले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचा मुलगा सुद्धा महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने आम्हालाही एक जागा द्यावी. महायुतीने आमच्या रिपाई पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.