
तुम्ही शिर्डीच्या (Shirdi News) साई मंदिरात जाणार असाल तर थांबा. कारण, 1 मे पासून शिर्डीत बेमुदत बंदची (Shirdi Band) हाक देण्यात आली आहे.
शिर्डी: साईभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी सुट्टी असल्याने अनेक जण बाहेर फिरण्याचे प्लॅन करतात. तुम्ही सुद्धा शिर्डीच्या (Shirdi News) साई मंदिरात जाणार असाल तर थांबा. कारण, 1 मे पासून शिर्डीत बेमुदत बंदची (Shirdi Bandh) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.
बेमुदत बंद का?
शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षेसाठी आता सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. ही सुरक्षा आल्यास ग्रामस्थांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीआयएसएफ सुरक्षेविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.सध्या शिर्डीच्या साई मंदिरात संस्थानचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यातच, आता सीआयएसएफच्या सुरक्षेची भर पडणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थांनी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
शिर्डीत काय सुरु आणि काय बंद राहणार?
मिळालेल्य माहितीनुसार या बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. पण शिर्डी बंद असल्याने वाहतुकीसह अन्य सुविधांपासून भक्तांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
दरम्यान, नुकतीच रामनवमी झाली. यानिमित्ताने देशभरातील लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. रामनवमीनंतर साई बाबांच्या दर्शनाकरता भक्तांचा ओघ वाढत असतो. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी शिर्डीत प्रचंड गर्दी होत असते. आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकजण या दिवशी शिर्डीत येण्याचे नियोजन आखत असतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे यादिवशी शिर्डीत जाण्याऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.