‘आमदारांनो, पुन्हा महाराष्ट्रात या’ असं म्हणत महिला शिवसैनिक भावूक होऊन ढसाढसा रडल्या

शिवसेनेच्या फुटीर आमदारांविरोधात सोलापूरात शिवसैनिक एकवटले आहेत. शासकीय विश्रामगृहात शहर व जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. सर्वांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व 'मातोश्री'सोबत असल्याचा एकमुखी निर्धार केला.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिवसेनेच्या फुटीर आमदारांविरोधात सोलापूरात शिवसैनिक एकवटले आहेत. शासकीय विश्रामगृहात शहर व जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. सर्वांनी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व ‘मातोश्री’सोबत असल्याचा एकमुखी निर्धार केला. यावेळी महिला शिवसैनिक भावूक झाल्या होत्या.

    यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना ‘पुन्हा महाराष्ट्रात या’, अशी भावनिक हाक दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या. एरव्ही गटबाजीत विखुरलेली शिवसेना अशी टिप्पणी होत असलेली शहर-जिल्हा शिवसेना मात्र आज एकत्रितपणे दिसली.

    सर्वगट आणि शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी शासकीय विश्रामगृह येथे एकत्र जमले. स्वकीयांनी बेदाली केली असली तरी वाघ वाघच आहे. शिवसैनिक डळमळीत होणार नाहीत, सारे शिवसैनिक या संकट काळात शिवसेनेतच राहतील आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठिशी असतील, असा निर्धार करण्यात आला.

    यावेळी पुरुषोत्तम बरडे, गुरुशांत धुत्तरगांवकर, गणेश वानकर, उत्तमप्रकाश खंदारे, प्रकाश वानकर, भाऊसाहेब अंदळगांवकर, महेश देशमुख, दिपक गायकवाड, प्रताप चव्हाण, सुनिल शेळके, अजय दासरी, अस्मिता गायकवाड, सीमा पाटील आदी प्रमुखांची भाषणे झाली.