साताऱ्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पोवई नाक्यावर एकत्र येत दिला पाठिंबा

शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.

    सातारा : शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हे भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा एक भाग असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्याने साताऱ्यातील शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी पोवईनाक्यावर एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठिंबा दर्शविला.

    विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यानुसार शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारत सुरतला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून दूर केले आहे.

    या सर्व घडामोडी सुरू असताना सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते मुंबईला रवाना झाले आहेत. तर उर्वरित शिवसैनिकांनी पोवईनाका येथे एकत्र येत रस्त्यावर बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला. ‘शिवसेना जिंदाबाद, जय भवानी…जय शिवाजी…, उद्धवसाहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…, आवाज कुणाचा…शिवसेनेचा’, अशी घोषणाबाजी केली.

    गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पोवईनाका येथील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत असल्याने शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

    यावेळी युवा सेनेचे सातारा शहर प्रमुख सचिन मोहिते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवण दिली आहे. २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण असून, आम्ही ती नेहमी पाळतो. यामध्ये शिवसेना ही चार अक्षरे, आमचे चिन्ह धनुष्यबाण व तिसरी गोष्ट पक्षप्रमुखांचे आदेश तंतोतंत पाळणे. सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व सर्व पदाधिकारी या कठीण प्रसंगामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.