नवा कुटाणा! तुला ना मला अन्…शिवाजी पार्क दसरा मेळाव्याचा तिढा सुटेना; परवानगी कोणालाच नाही; उद्या पुन्हा सुनावणी

शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर शिवाजीपार्क येथे होणारा शिवसेना दसरा मेळावा कोणाचा असा वाद सुरू झाला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर अद्यापपर्यंत मुंबई महपालिकेने कोणताही निर्णय घेतला नसल्याने अखेर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

  मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava Shivaji Park) महापालिकेने (BMC) ठाकरे आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे (Not Give The Permission to Uddhav Thackeray And Eknath Shinde Group). त्यामुळे जागेचा तिढा आणखी वाढला असताना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी हस्तक्षेप अर्ज (Application For Intervention) केल्याने याचिकेत सुधारणा करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली त्याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवर सुनावणी शुक्रवारी निश्चित केली.

  शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर शिवाजीपार्क येथे होणारा शिवसेना दसरा मेळावा कोणाचा असा वाद सुरू झाला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर अद्यापपर्यंत मुंबई महपालिकेने कोणताही निर्णय घेतला नसल्याने अखेर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्या. रमेश धनुका आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.

  शिंदे गटाकडून हस्तक्षेप अर्ज

  शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे, हा वाद न्यायप्रविष्ट असताना ठाकरे गटाने आपणच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत मागील दरवाज्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्न केला आहे. ही न्यायालयाची एकप्रकारे दिशाभूल असल्याच दावा करत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप अर्जातून केला आहे. याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर महत्त्वाच्या बाबी जाणीवपूर्वक दडवल्या आहेत. आपण विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेनेचा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी म्हणून अर्ज केला असल्याचेही सरवणकर यांनी अर्जातून स्पष्ट केले आहे.

  पालिकेने दोघांचाही अर्ज फेटाळला

  शिवसेनेच्यावतीने मुंबई महापालिकेच्या दादर जी-उत्तर विभागात २२ ऑगस्टला अर्ज करण्यात आला. तर त्यानंतर शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी ३० ऑगस्टला अर्ज केला होता. ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाने पोलिसांशी चर्चा करून कायदा आणि सुववस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून दोन्ही गटांचा अर्ज फेटाळून लावले.

  नव्याने याचिकेला परवानगी

  पालिकेने परवानगी नाकारल्यानंतर तसेच शिंदे गटाकडून हस्तक्षेप अर्जा दाखल केल्यामुळे याचिकेत सुधारणा करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ आस्पी चिनॉय यांनी खंडपीठाकडे केली. त्यास मान्यता देत न्यायालयाने सुधारित याचिकेची प्रत प्रतिवादींना देण्याचे निर्देश देत सुनावणी शुक्रवारी निश्चित केली.