शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे ठाण्यात; मोठी जाहीरसभा घेणार

ठाणे लोकसभा महायुतीचे (Thane Lok Sabha) शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे रविवारी ठाण्यात येणार आहेत.

    ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे (Thane Lok Sabha) शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे रविवारी ठाण्यात येणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला ते भेट देऊन आनंद दिघे यांचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच दिघेसाहेबांचा खरा शिष्य कोण? या वादावर आता राज ठाकरे हे पडदा टाकणार आहेत.

    धर्मवीर आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश म्हस्के यांच्यावर विद्यार्थी सेनेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून नरेश म्हस्के यांची ओळख आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यावर नरेश म्हस्के यांनी राजगड येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मनसैनिक नरेश म्हस्के यांच्या पाठिशी खंबीर उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती.

    राज ठाकरे काय बोलणार? यावर सगळ्यांचे आता लक्ष आहे. नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच महायुतीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्तेदेखील यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.