
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अकराव स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज अकरावा स्मतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिना त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) अनेक नेते, शिवसैनिक दाखल होत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल होत आहेत.
शिवतिर्थावर शिवसैनिकांची गर्दी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतिदिनानिमित्ता आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळी खास फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून या शिवतिर्थावर शिवसैनिकांची रिघ लागली आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक नेते, शिवसौनिक शिवतिर्थावर येत आहे. त्याचप्रमाणे शिंदे गट, भाजप तसेच महाविकास आघाडीचे नेतेही बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकरते देखील या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. यामुळे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांत राडा
स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार…गद्दार…अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली..तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.