दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या होणार सुनावणी

या पार्श्वभुमीवर शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

    मुंबई : नवरात्रौत्सव काही दिवसांवर आलाय तरी मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा (Shivsena Dasara Melava controversy) वाद मिटायची काही चिन्ह दिसत नाही आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं दसरा मेळाव्यासाठी मुंबई पालिकेकडे पुर्व परवानगी मागुनही पालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याने शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायलयात उद्या सुनावणी होणार आहे.

    शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. दरवर्षी शिवसेनेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यात येतो. मात्र या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटानं आणि शिंदे गटामध्ये दसरा मेळावा घेण्यावरुन स्पर्धा सुरु झाली. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल केला. मात्र, दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही.