
वैभवशाली गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन दहा दिवसांच्या नियोजनाची व बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे उपायुक्त ए.राजा उपस्थित होते.
पुणे – कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी होऊ घातलेल्या गणेशोत्सव यंदा काही प्रमाणात निर्बंधमुक्त होणार असून, गणेश मंडळांना मिरवणूकीदरम्यान किती ढोल ताशा पथके लावावीत याला मर्यादा नसणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाची मिरवणूक धुमधडाक्यात होणार आहे.
गणेशोत्सावाच्या दहा दिवसांच्या काळात पुणेकरांच्या सेवेसाठी “सीपी टू कॉन्स्टेबल” सज्ज झाले आहेत. यंदा शहरात ३ हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करत असून, ४ लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सवात साडे सात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. परंतु, डीजेचा आवाज नियमानुसारच असणार असून, मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
वैभवशाली गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन दहा दिवसांच्या नियोजनाची व बंदोबस्ताची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे उपायुक्त ए.राजा उपस्थित होते.
पुण्यात वैभवशाली गणेशोत्सवाची तयारी जय्यत सुरू आहे. मंडळे गणेश आगमनाची तयारी करत आहेत. उत्साही वातावरण शहरात पाहिला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी देखील जोरात तयारी केली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा या कालावधीत तैणात असणार आहे. सीपी टू कॉन्स्टेबल असा बंदोबस्त पुण्यात प्रथमच पाहिला मिळणार आहे. यासोबतच बीडीडीडी पथके, क्यूआरटीचे अधिकारी, एसआरपीएफची दोन कंपन्या बंदोबस्तात सहभागी असणार आहेत. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मिरवणूका लांबणार…
पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांची संख्या एका मंडळासमोर किती असावी, याचे निर्बंध हटविले गेल्याने यंदा मिरवणूका लांबणार असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत मानाच्या तसेच इतर महत्वाच्या मंडळासमोर किती ढोल-ताशा पथक लावावे, याबाबत पोलिस नियम घालून देत होते. त्यानूसार, एका मंडळांसमोर तीन व त्यापेक्षा कमी पथक असत. परिणामी मंडळे पुढे सरकण्यास व मिरवणूक संपण्यास मदत होत असत. तसेच, मंडळांमधील अंतर देखील जास्त होत नव्हते. परंतु, यंदा ही मर्यादाच नसणार असल्याने मिरवणूका लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.