शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन; वयाच्या 74 व्या घेतला अखेरचा श्वास

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आकस्मित निधन झाले. न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

    सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आकस्मित निधन झाले. न्यूमोनिया झाल्याने मंगळवारी दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. गुवाहाटीमध्ये जाणाऱ्या आमदारांमध्ये अनिल बाबर हेदेखील होते. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली.

    चारवेळा आमदार

    अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झाले. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गार्डी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते.