विद्वान अधिकारी रस्त्यावर उतरून बघा, खड्डे भरण्यासाठी दिलेले १६ कोटी गेले कुठे, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संतप्त सवाल

कामे चांगल्या दर्जाची केली जात नाही या टिकेनंतर आयुक्त भाऊसाहेब दांगडे स्वत: रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी कामाची पाहणी केली होती.

    कल्याण : केडीएमसीत काही विद्वान अधिकारी आले आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन त्यांची विद्वत्ता दाखवावी. गणपतीचे आगमन झाले आहे. रस्त्यावर खड्डे आणि त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यात येणारे १६ कोटी रुपये कुठे गेले असा थेट सवाल शिवसेना पदाधिकारी मोहन उगले यांनी विचारला आहे. त्यामुळे आत्ता महापालिका प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आयुक्तांनी खड्डे भरण्यात निष्काळी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते.

    कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यात महापालिकेकडून दिरंगाई केली जात आहे. या प्रकरणी अनेकांनी आवाज उठविला आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने १६ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेनुसार महापालिका हद्दीतील १० प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत १३ कंत्राटदारांना खड्डे बुजविण्याचे काम विभागून दिले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याची पोलखोल शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी केली होती. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील प्रशासनाला जाब विचारत रस्ते बुजविण्याच्या कामात टक्केवारी घेतली जाते. त्यामुळे कामे चांगल्या दर्जाची केली जात नाही या टिकेनंतर आयुक्त भाऊसाहेब दांगडे स्वत: रस्त्यावर उतरले हाेते. त्यांनी कामाची पाहणी केली होती.

    या पाहणी पश्चात त्यांनी १३ सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील असा दावा केला होता. या दाव्यानुसार त्यांनी दिलेली डेडलाईन उलटून गेली तरी कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांची डेडलाईन फेल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मोहन उगले यांनी देखील प्रशासनाला लक्ष करुन रस्ते बुजविण्याच्या कामावर केला जाणारा खर्च खड्ड्यात जाणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गणरायांचे आगमन रस्तेमय खड्ड्यातून होत असल्याने उगले यानी प्रशासनाच्या या दिरंगाई विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.