खासदार संजय राऊत यांनी केले स्पष्ट; म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत’

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडी हे महाविकासआघाडीचा एक घटक पक्ष असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्षांनी राज्यामध्ये तयारी सुरु केली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीमध्ये (MVA) वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सामील होणार का याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. याबाबत आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडी हे महाविकासआघाडीचा एक घटक पक्ष असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधत ‘भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा आहे’ अशी जहरी टीका केली.

    मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूकीच्या तयारीसाठी होणाऱ्या मविआच्या बैठकीची माहिती दिली. यावेळी राऊत म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे आज चर्चेला बसणार आहेत. हे नक्की आहे. कारण आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृतपणे समावेश झाला आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा मविआचा घटक आहे. आज आम्ही सर्व एकत्र बसणार. आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही ही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची मदत आमच्या लढाईत फार महत्वाची आहे. प्रकाश आंबेडकर सकाळी साडेअकरा वाजता स्वतः चर्चेत सहभागी होतील,” असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

    सध्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे अजित पवार यांची साथ सोडत भाजपच्या वाटेवर आहेत या चर्चांना उधाण आले. यावरुन संजय राऊत यांनी भाजप आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, “अंजली दमानिया यांचं वक्तव्य ऐकलं आहे. छगन भुजबळ कोणत्या पार्टीत जातील? काय करतील? याबद्दल मी बोलू शकत नाही. मी काय फक्त बघू शकतो? ईडी ला विचारावं लागेल. ईडी, अँटी करप्शन आणि बीजेपीने त्यांच्यावर आरोप लावले होते. तेव्हा नेत्यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं. आता त्यांची फाईल भेटत नाही आहे. पण ते बीजेपीचा चेहरा बनू शकतात, असा जर म्हणणं असेल तर अजित पवार , हसन मुश्रीफ, भावना गवळी त्यांचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचार हा बीजेपीचा चेहरा आहे. जो भ्रष्टाचारी बीजेपी सोबत चालेल तो पवित्र बनला जाईल,” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.