‘अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम’; नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचा टोला

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम' अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नितीश कुमारांना टोला लगावला.

    अहमदनगर : बिहारमध्ये (Bihar) सध्या राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. महागठबंधनमधून बाहेर पडत नितीश कुमार (Nitish Kumar resignation) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. इंडिया आघाडीचा (India Alliance) पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांची चर्चा होत असताना त्यांनी भाजपसोबत जाण्याचा (Nitish Kumar In BJP) निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटूराम’ अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नितीश कुमारांना टोला लगावला.

    अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या राजकीय घडामोडींवर मत मांडले. यावेळी नितीश कुमार यांना धारेवर धरत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

    राज्यामध्ये देखील दोन पक्षातील गटांना सोबत घेऊन भाजप सत्तारूढ झाली. यावरुन बोलताना राऊत म्हणाले, “राज्यात गुंडगिरीवर सुरू आहे. नवीन सरकार आल्यापासून अहमदनगरच्या आमदारांची गुंडगिरी वाढली आहे. अहमदनगरमध्ये गुंडांच राज्य सुरू झालं आहे. हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत. अहमदनगरमध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्या आहेत. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्या होत्या. छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, ते सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी बाहेर पडावं,” असा राजकीय सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.