पुणे पोलीस आयुक्त घाबरले का? संजय राऊतांचा नवनियुक्त आयुक्तांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर सवाल उपस्थित करत आता परेड काढणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.

    पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांवर (Pune Police Commissioner) गंभीर आरोप केले आहेत. पुण्यामध्ये जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्यावर सवाल उपस्थित करत आता परेड काढणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.

    पुण्यामध्ये ‘निर्भय बनो’ सभेमध्ये (Nirbhay Sabha) हिंदुत्ववादी संघटनेने तुफान राडा घातला. निखिल वागळे यांच्या वादग्रस्त विधानांनंततर भाजप व काही संघटनांनी या सभेला विरोध केला. निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड करत शाईफेक करण्यात आली. पुण्यामध्ये झालेल्या या प्रकरानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यात तुम्ही लक्ष घाला. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय. गुंडांनी राज्याचा ताबा घेतलाय. त्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे. ताबडतोब निवडणुका घ्याव्यात. नाहीतर गुंड इथे हैदोस घालतील. हा हैदोस चालूच आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला.

    पुढे संजय राऊत यांनी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांना देखील या प्रकरणावर खडेबोल सुनावले. राऊत म्हणाले, “पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला. तिथल्या पोलीस आयुक्तांनी चार्ज घेतला तेव्हा काही गुंडांची ओळख परेड केली होती. काल ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला, त्यांची परेड का नाही केली? पोलीस आयुक्त घाबरले का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचं समर्थन करतायेत. पोलीस आयुक्तांनी ही नौटंकी बंद करावी. हे हल्ले करणाऱ्या राजकीय गुंडांचीही परेड करा. त्यांच्या हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते”, असा घणाघात संजय राऊतांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर केला आहे.