‘देशात सर्वात मोठा विरोध मोदी आणि शाह यांना’; मुंबईतील रोड शोवरुन संजय राऊत आक्रमक

खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला. रोड शोसाठी कार्यवाहक प्रधानमंत्री हे आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

    मुंबई : मुंबईचे मतदान पाचव्या टप्प्यामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय लोकांची मांदियाळी मुंबईमध्ये जमली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर परिसरामध्ये रोड शो पार पडला. यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कोलमडली. चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला. रोड शोसाठी कार्यवाहक प्रधानमंत्री हे आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

    जीव गेला त्या ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात

    माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, येत्या चार जूनला हे समजेलं की, कोणता पक्ष कुठे आहे आणि बीजेपी कुठे आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शोसाठी कार्यवाहक प्रधानमंत्री हे आहेत. काल सगळं बंद केलेलं होतं मेट्रो, रेल्वे, रस्ते. हे सगळं कोणासाठी? अशा प्रकारचा प्रचार कधी देशात झाला नव्हता, असे कोणतेही पंतप्रधान या आधी पाहिले नाहीत. एका माणसाचा प्रचार सुरळीत व्हावा यासाठी लोकांची गैरसोय करणार हे पहिल्यांदा पाहिलं. मोठं होर्डिंग पडून ज्या ठिकाणी सतरा लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी प्रधानमंत्री रोड शो करतात. महाराष्ट्रात आणि देशात सर्वात मोठा विरोध मोदी आणि शाह यांना होत आहे. 4 जून नंतर या देशात भाजपाचे अस्तित्व राहणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे,” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

    हेच लोक चोरांचे सरदार

    पुढे त्यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांचा जाहीरनामा देखील घटनाबाह्य आहे. हेलिकॉप्टरमधून खोके उतरवायचे, पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटायचे, खोट्या योजना आणायच्या हा त्यांचा जाहीरनामा आहे. ज्यांनी पार्टीवर डाका टाकला, यांनी मान्य केलं की चोरी केली आहे. चोरांला मदत करणारे पंतप्रधान, गृहमंत्री, चुनाव आयोग हे लोक चोरांचे साथीदार आहेत. हेच लोक चोरांचे सरदार आहेत. त्यामुळे आम्हाला देशात परिवर्तन आणायचंय आणि आम्हाला देशाच्या संविधानाचे रक्षण करायचे आहे,”अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे सेनेवरील राग व्यक्त केला.