बजेटवरुन उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले,’हे सर्व थोतांड…’

निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    रायगड : आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २०२४-२५ सालाचे अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यामध्ये त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये (Tax slab) कोणताही बदल न करत महिलांचा विकास, शेतकरी, गरीब कल्याण, रोजगार या विषयांवर आधारित बजेटमध्ये घोषणा केल्या. लोकसभा निवडणूकीपूर्वी (Lok Sabha elections 2024) मोदी सरकारचे (Modi government) हे शेवटचे बजेट असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या बजेटकडे लागले होते. निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    रायगड जिल्ह्यातील पेण या ठिकाणी जाहीर सभेमध्ये भाषण देताना उद्धव ठाकरे यांनी बजेटवरुन केंद्र सरकारला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आज पेणमध्ये येत असताना मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. शेवटचा अर्थसंकल्प आहे हे लक्षात घ्या. निर्मला सीतारमण यांनी जड अंतःकरणाने कार्य पार पाडलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. मी सगळा अर्थसंकल्प पाहिला नाही. पण हायलाईट्मध्ये वाचलं की देशात आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी आम्ही काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी पंतप्रधान मोदींसमोर हे बोलण्याचं धाडस केलं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हे त्या बोलल्या. निवडणुका आल्यानंतर तरीही त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की देशात फक्त तुमचे सुटाबुटातले मित्र नाहीत. तुमच्या मित्रांच्या पलिकडे सुद्धा देश आहे. ज्यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब आहेत. दहाव्या वर्षी या चार जाती तुम्हाला कळल्या. तुमच्या बरोबरचे अदाणी म्हणजे देश नाही. सुटाबुटातलं सरकार आता गरीबांकडे लक्ष द्यायला आलं आहे.” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

    पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “महिलांकडे लक्ष देत आहात, मणिपूरमध्ये का गेला नाहीत? त्यांना सांगा आमच्या देशात महिला आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. पण निवडणुकांमध्ये महिलांची मतं हवी आहेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आता महिलांसाठी काम करणार. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना सोडलं होतं. त्यांना सांगा आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहोत. शेतकऱ्यांनी जेव्हा वर्षभर आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता अतिरेक्यांना शेतकरी समजत आहात. हा सगळा भुलभुलैय्या आणि थोतांड आहे” अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली आहे. यापुढे मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकडे जाणार असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.