केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, पोलिसांनी शिवसैनिकांना घेतले ताब्यात

यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेने आंदोलन करणारे शिवसैनिक अचानक घोषणाबाजी करत रस्त्याच्या दिशेने चालून आले आणि त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

    नागपूर : संजय राऊत यांच्यावर ईडीचे कारवाई सुरू झाल्यानंतर नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. नागपुरच्या व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत ईडी कारवाईचा निषेध केला.

    पत्राचाळ प्रकरणी ईडीनं कारवाई करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. त्यापुर्वी आज सकाळी त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रीया येत आहे. या कारवाईला राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे. आज नागपुरात शिवसेनेच्या वतीने संजय राऊतांवरील कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

    यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेने आंदोलन करणारे शिवसैनिक अचानक घोषणाबाजी करत रस्त्याच्या दिशेने चालून आले आणि त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. या दरम्यान, जवळपास 25 ते 30 शिवसैनिकांना पोलिसांनी रस्ता रोको करण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले आहे. सूडबुद्धीने संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई केली जात असून ईडी केंद्र सरकारच्या हातचा बाहूला बनल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.