शिवसेनेच्या बंडाळीचे मूळ कोल्हापूरात!  बंडखोरांना साथ देण्याची परंपरा, आमदार फोडण्याची मोहीम कोल्हापुरातून  

  दीपक घाटगे, कोल्हापूर :  शिवसेनेला बंड काही नवे नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून संघटनेत मनोहरपंत जोशी यांना महत्त्व दिले जात असल्याचा राग मनात ठेवून छगन भुजबळ यांनी पहिले बंड केले ,तेव्हा त्यांनी शिवसेनेतील आमदार फोडण्याची मोहीम कोल्हापुरातून सुरू केली होती. त्यावेळी त्यांना पहिली साथ शिवसेनेचे कोल्हापुरातील पहिले आमदार दिलीप देसाई यांनी दिली होती. आता राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी साथ दिली आहे.

   भुजबळ यांच्यावेळी देखील कोल्हापूरातूनच सुरुवात
  शिवसेनेत मनोहरपंत जोशी त्यांचे भाचे सुधीर जोशी या दोघांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचली तरी आपणास काही मुख्यमंत्री केले जाणार नाही, असा विचार करून छगन भुजबळ यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून बंड करण्याचा विचार सुरू केला. शिवसेनेत फूट पाडण्याची सुरुवात कोल्हापूरातूनच करायची असा विचार करून ते कोल्हापुरात आले होते. त्यांनी पहिली भेट शिक्षण महर्षी प्राचार्य एम. आर. देसाई यांची भेट घेतली अर्थात त्यांना शिवसेनेचे पहिले आमदार दिलीप देसाई यांच्याशी गोपनीय चर्चा करावयाची होती.

   देसाई यांची भुजबळांना साथ
  छगन भुजबळ हे न्यू शाहूपुरी येथील दिलीप देसाई यांच्या निवासस्थानी असल्याचे वृत्त समजल्यानंतर काही पत्रकार त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेले होते. तेव्हा आपला कोल्हापूरचा दौरा हा काही राजकीय नाही असे सांगितले. पण बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी त्यांना विचारले असता बाळासाहेब हे माझे परमेश्वर आहेत, आणि या माझ्या देवाला शंभर वर्षांचे आयुष्य लाभू दे असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. दिलीप देसाई यांची भेट घेऊन झाल्यानंतर ते मुंबईत परतले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसात छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले तेव्हा त्यांच्याबरोबर शिवसेनेतील जे काही आमदार होते त्यामध्ये दिलीप देसाई यांचा समावेश होता. दिलीप देसाई यांनी छगन भुजबळ यांना साथ दिल्याचे समजल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात एक मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांच्या घरासमोर एक मोठा मोर्चा शिवसैनिकांनी नेला होता आणि त्याचे नेतृत्व नंतर दोन वेळा आमदार झालेले सुरेश साळोखे यांनी केले होते.छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

   राणेंचा सेनेला जय महाराष्ट्र
  मनोहरपंत जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले होते .नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लढविल्या; पण सत्ता मिळविता आली नाही. त्यानंतर अवघ्या सात आठ महिन्यात नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राणे यांचे हे शिवसेनेतील दुसरे बंड होते राणे यांनी शिवसेना सोडताना शिवसेनेतील काही आमदारांना आपल्याबरोबर नेले होते. पण या फुटीर आमदारांचे नंतर राजकीय पुनर्वसन होऊ शकले नाही. उलट यांच्यासोबत गेले त्यांना नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवता आली नाही.

   मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेनी केलेले हे तिसरे बंड
  छगन भुजबळ तसेच नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडाळी करताना त्यांच्यासमोर सत्ताकारण महत्त्वाचे होते. कारण या दोघांनाही येनकेन प्रकारणे सत्तेत जावयाचे होते. पण या दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे तिसरे बंड आहे आणि हे बंड शिवसेनेत उभी फुट पाडणारे आहे. पण या बंडामागे एक राजकीय विचार आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याशी युती करू नये ; तो एक राजकीय वैचारिक व्यभिचार ठरेल अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षापूर्वी घेतली होती. अंतरीही इच्छेविरुद्ध अस्तित्वात आलेल्या महविकास आघाडीच्या सरकार मध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री बनले. पण त्यांची वैचारिक घुसमट होत होती त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण हाती घेतलेले आहे. आणि त्यांच्या या राजकीय बंडाळीला  राधानगरी ,भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी साथ दिली आहे.

  काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांचेही बंड
  केले .तेव्हा काँग्रेसमधील ३४ आमदारांना बरोबर घेऊन वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडले. तेव्हा काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या कोल्हापूरच्या श्रीपतराव बोंद्रे यांनी शरद पवार यांना साथ दिली असे म्हणतात. शरद पवार यांना साथ देणारे ते ३५ वे आमदार होते .त्यांना त्याबद्दल कृषी खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते. राजकीय बंडखोरांना साथ देण्याची परंपरा कोल्हापुरातील आमदारांनी नंतर जपलेली दिसते. छगन भुजबळ यांना दिलीप देसाई यांनी साथ दिली. तर आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कोल्हापूरचे अर्थात राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर हे आहेत.