आढळरावांच्या पक्षांतराने शिवसेनेची ताकद कमी झाली; डॉ. नीलम गोऱ्हे यांची खंत

शिरूर लोकसभा मतदार संघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद कमी झाली. परंतु ते ताटातून वाटीत गेले, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

    पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद कमी झाली. परंतु ते ताटातून वाटीत गेले, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

    डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा जागा वाटपमध्ये महायुतीत प्रत्येकाच्या आशा पूर्ण होतील, असे नसते. युतीमध्ये यापूर्वी ही तडजोडी झाल्या आहेत. महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या कामाला लागलो आहोत.

    वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि हिंगोलीचे हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भाजपने आमचे उमेदवार बदलले, असे पर्सेप्शन तयार केले जात आहे, परंतु अशा प्रकारे गैरसमज पसरवणे योग्य नाही. यापूर्वी ही पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली गेली आहे. महायुतीत एकत्र काम करण्यासाठी केलेले समीकरण असते. त्याला अंतिम स्वरुप येण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे आधीपासून असे आडाखे बांधणे योग्य नाही. आमच्याकडे अजून कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आरोप केले नाहीत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

    पुण्यातील लढत दुहेरीच

    मनसेला सोडचिठ्ठी दिलेले वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवल्याने लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. त्यावर डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, गेल्या काही निवडणुकीतील अनुभव पाहता वंचितचा सुरुवातीला जोर असतो. पण मतदानावेळी तो कमी होतो. त्यामुळे पुण्याची निवडणूक ही मोहोळ विरूद्ध धंगेकर अशी दुहेरी च होईल, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.