विस्मृतीत गेलेले पारोळमधील शिलाहारकालीन ओढा शिवमंदिर, दुर्लक्षणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर

किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींनी सातत्याने १५ वर्षे सदर भुईसपाट होणाऱ्या मंदिराचे अवशेष संवर्धन करण्यासाठी कष्टमय श्रमदान केले.

    रविंद्र माने-वसई-विरार : शिलाहार सत्तेच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे पारोळ येथील ओढा शिवमंदिर विस्मृतीत जात चालले आहे. त्यामुळे शिलाहारांचा नामोल्लेखही पुसला जाण्याची भिती किल्ले वसई मोहिम परिवाराने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौलपर्यंत पसरलेली होती आणि सन ७६५ ते १०२४ पर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष राज्य करीत होती.ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिह्याचा दक्षिण भाग आणि ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा समावेश होता. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लिकार्जुन, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळत आहे.

    उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्ती पासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्वर असा समावेश होता. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्ठात आणली. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू आणि अवशेष वसई प्रातांत विखुरलेल्या आहेत. यातील एक हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे विस्मृतीत गेलेले पारोळ मधील शिलाहारकालीन ओढा शिवमंदिर आहे. किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख व इतिहास अभ्यास श्रीदत्त राऊत यांनी सन २००६-०८ च्या सुमारास ब्रिटिश लायब्ररी संग्रहातील पारोळ प्रांताची जुनी छायाचित्रे अभ्यासपूर्ण व प्रत्यक्षात भटकंती करत स्थळे उजेडात आणली आहेत. यात किल्ले वसई मोहिमेच्या प्रतिनिधींनी सातत्याने १५ वर्षे सदर भुईसपाट होणाऱ्या मंदिराचे अवशेष संवर्धन करण्यासाठी कष्टमय श्रमदान केले.

    या भागातील ओढ्यात विखुरलेले कळस, पायरी अवशेष, नक्षीकाम शिळा, राजवाडा अवशेष, शिवलिंग शाळूका पुरातत्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच ओढ्याच्या घेऱ्यात असणाऱ्या गध्येगाळ शिळा, खोदीव टाके, घरांचे अवशेष इत्यादी श्रीदत्त राऊत यांनी सातत्याने उजेडात आणून संवर्धनासाठी जागृती केली आहे. किल्ले वसई मोहिम परिवार अंतर्गत राऊत यांनी गेली १५ वर्षे सातत्याने इतिहास सफर मोहिमा, श्रमदान मोहिमा आयोजित करून पारोळ प्रांत उजेडात आणला आहे. ओढा शिवमंदिर प्रमाणे पारोळ मधील इतर प्राचीन शिवमंदिरे देखील स्थानिक मंडळींच्या दुर्लक्षणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या भागातील विहिरींच्या बांधकामासाठी उपयोगात आणलेली शिल्पे व नक्षीकाम शिळा श्रीदत्त यांनी पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणली होती. पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि स्थानिक अतिक्रमणे यात पारोळ मधील इतिहास ठेवा लोप पावत चालल्याची खंत श्रीदत्त यांनी व्यक्त केली आहे.