‘शिवालय’ रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर : राजेश क्षीरसागर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने २००७ मध्ये लावलेल्या 'शिवालय' शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत राजकीय क्षेत्रात काम करत आलो.

    कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशिर्वादाने २००७ मध्ये लावलेल्या ‘शिवालय’ शिवसेना शहर कार्यालय या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आजपर्यंत राजकीय क्षेत्रात काम करत आलो असून, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवालय मंदिरातून जनसेवेचे व्रत अखंडित जोपासू, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच ‘शिवालय’ रंजल्या, गांजल्या व गोरगरीब-वंचितांसाठीचा आधारवड बनेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

    जनसेवेचे मंदिर आणि सेनाभवनाचे प्रतिबिंब असलेल्या ‘शिवालय’ शिवसेना शहर कार्यालयाचे शिवसेना वर्धापनदिनी झालेल्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. राजेश क्षीरसागर यांनी प्रथम उपस्थित शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    ते पुढे म्हणाले की, २००७ पासून शिवालय कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील आणि सीमाभागातील नागरिकांना आपुलकीचे आणि हक्काचे ठिकाण बनले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांची शिदोरी घेऊन समाजकार्याच्या प्रत्येक कामात, चळवळीत हजारो शिवसैनिकांना बळ देणारी, लाखो नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी १२ महिने २४ तास जनसेवेत कार्यरत राहण्यासाठी या शिवालयमधून प्रेरणा मिळत आहे.

    शिवालय ही नुसती वास्तू नसून, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी निर्माण झालेलं प्रेरणास्थान आहे. आगामी काळात शिवालयमधून समाजोपयोगी कामांची घोडदौड अखंडित सुरु राहील. शिवालय हे शिवसेनाभवनाचे प्रतिबिंब असून, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे बालेकिल्ले पुन्हा जिंकून शिवसेनेस गतवैभव प्राप्त करून देऊ, असे सांगितले.