शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता; स्कॉर्पिओ गाडीसह मिळविली मानाची चांदीची गदा

धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता नांदेडचा मल्ल शिवराज राक्षे ठरला.

    धाराशिव : धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता नांदेडचा मल्ल शिवराज राक्षे ठरला. या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब व महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घरण्याकडून परंपरेने चालत आलेली चांदीची गदा देण्यात आली. तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून देण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले .

    धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील गुरुवर्य के.टी पाटील सर (बप्पा ) क्रीडा नगरीमध्ये दि. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते, या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण याचे उत्तर झालेल्या लढतीत सर्वांना मिळाले. रुस्तुम-ए – हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यावर रंगलेल्या उपांत्य चुरशीच्या लढतीत नांदेडाचा शिवराज राक्षे व मुंबई पाश्चिम उपनगराकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात गादी गटात चुरशीची लढत झाली, या एकतर्फी लढतीत 6 – 0 गुणांने नांदेडचा शिवराज राक्षे विजयी झाला. तर माती गटात झालेल्या हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत 2-6 ने नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली

    महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर व नांदेडचा शिवराज राक्षे या दोन मल्लानी बाजी मारत शेवटच्या अंतिम कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांनी धडक मारली. यानंतर २० मिनिटांच्या विश्रांतीनंतर या दोन मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता. या अटीतटीच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींचे लक्ष लागले होते, शेवटच्या या अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत या 6-0 गुणांनी नांदेडचा शिवराज राक्षे या पैलवानाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला.

    या अंतिम टप्प्यातील कुस्त्या पाहण्यासाठी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ख्यातनाम आजी – माजी मल्लासह पद्मश्री , ऑलिंपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेता योगेश्वर दत्त , महाराष्ट्र केसरी राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, कळंब – धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी खासदार रविंद्र गायकवाड आणि असंख्य कुस्ती शौकीनांनी मैदानावर प्रचंड गर्दी केली होती.