शिवऋण प्रतिष्ठानने वाचविले वासराचे प्राण, रस्त्याच्या बाजूला केली शस्त्रक्रिया

गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर एका वासराचा अपघात झाला. ही माहिती कळताच पालीतील शिवऋण प्रतिष्ठानच्या टीमने तेथे धाव घेतली आणि वासराला सुरक्षित ठिकाणी ठेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच रात्री या वासरावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

    मुंबई : गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर एका वासराचा अपघात होऊन ते भर पावसात जखमी, जर्जर आणि पाय तुटलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. ही माहिती कळताच पालीतील शिवऋण प्रतिष्ठानच्या टीमने तेथे धाव घेतली आणि वासराला सुरक्षित ठिकाणी ठेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच रात्री या वासरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अथक प्रयत्नांनी या वासराचे प्राण वाचविण्यात यश आले.

    शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके यांनी सांगितले की, पावसात जखमी अवस्थेत एक वासरू पडले आहे. याची माहिती पालीतील प्रणित म्हात्रे व अमित निंबाळकर यांनी समाज माध्यमांवर टाकली होती, लगेच शिवऋण प्रतिष्ठानच्या टीमने वाकणकडे धाव घेतली. या वासराचा एक पाय तुटला होता. त्यावर आधी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. यावेळी सुधागड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांच्या सहकार्याने नागोठणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे यांना संपर्क केला. डॉ. सांगळे घटनास्थळी त्वरित आले. पुढच्या डाव्या पायाला जबर मार लागला असल्याने पुढील पाय ढोपरापासून खाली कापावा लागेल, असे सांगितले.

    ताबडतोब रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या शेडखाली वासराच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा या वासराला टेम्पोमध्ये घालून घोटवडे येथील गो शाळेत सुरक्षित नेण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्याला पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावर, डॉ. प्रशांत कोकरे, डॉ. सांगळे, शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके, सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील, अमर लहाने, निखिल शहा, नीरज साजेकर, सौरभ जांभेकर, रुपेश जांभेकर, श्री. सुनील व वाकण ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे वासरू घोटवडे गोशाळेत सुखरूप आहे.

    सकाळी या वासराच्या जखमेवर मलमपट्टी करण्यात आली आहे, तसेच अँटिबायोटिक आणि वेदनाशामक इंजेक्शन दिले आहे. वासराची तब्येत आता ठीक आहे.
    -डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, सुधागड