आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक अयोध्येत रवाना

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी (Ayoddhya Tour) शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. १५ ते अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीतीरी (Sharyu River) होणाऱ्या गंगा आरतीत (Ganga) सहभागी होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

    १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार असले तरी सोमवारपासूनच राज्यभरातून शिवसैनिक (Shivsainik) अयोध्येला रवाना झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथून शिवसैनिक अयोध्याला रवाना झाले असून कोणतेही शक्तिप्रदर्शन शिवसेनेला करायचे नाही. अयोध्या हे हिंदूंसाठी श्रद्धास्थान आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे तिकडे जात असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले.

    मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कडाडून विरोध करणाऱ्या अयोध्येसह उत्तर प्रदेश वासियांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नवीन फायरब्रँड नेते मानले जातात. शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे, असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे.