एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करणाऱ्या साताऱ्याच्या शंभूराज देसाईंना सेनेने धाडली नोटीस; ‘…नाहीतर पक्ष सोडा’

बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास अनुपस्थित राहता येणार नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल.

    सातारा : विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हेही आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. अशात शिवसेनेकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून या बैठकीला हजर राहण्यास सांगितले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाहीतर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

    राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ‘वर्षा’वर तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठविली आहे.

    तसेच याची माहिती व्हॉट्सॲप व एसएमएसद्वारेही कळविली आहेत, असे पत्रातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले आहे.

    बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास अनुपस्थित राहता येणार नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल. परिणामी, आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही पत्रात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले आहे. हे पत्र मुख्य प्रतोद शिवसेना विधिमंडळ पक्ष सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.