निर्णयावर आदित्य ठाकरे संतापले; “देशात लोकशाहीची निर्लज्ज हत्या करुन हिटलरशाही सुरु…”

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जहरी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. ही लोकशाहीची निर्लज्ज हत्या असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा सुनावणीवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल  नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निकाल दिला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) असून भरत गोगावले (Bharat Gogavle) यांची प्रतोदपदी निवड योग्य ठरवली आहे. यामुळे ठाकरे गटाला (Thackeray group) जोरदार धक्का बसला असून सध्याचे सरकार देखील स्थिर राहिले आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली जात असून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी जहरी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. ही लोकशाहीची निर्लज्ज हत्या असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

    आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांच राजकारण झालं, तर अशाच प्रकारे त्यांना वाचवलं जाणार. मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे” या शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

    तसेच बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान भाजपाला मान्य नसल्याचे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. “भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायच आहे, ते स्पष्ट झालं” अशा कडक शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

    पुढे त्यांनी हा निर्णय देणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नार्वेकरांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ठअनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते?. लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत, असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक. जगाला आता कळलेलं आहे की, आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेली आहे” असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.