अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा म्हणत…ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पक्षश्रेष्टीवर नाराज होऊन ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिला.

    ठाणे : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून ठाकेर गटाला गळती लागल्याचं दिसत आहे. ठाण्यात शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आता ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील (Praksha Patil) यांनी राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्टीमुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

    प्रकाश पाटील यांच्या राजीनाम्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयाचे ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पडसाद उमटणार आहे. मात्र, पडघा येथे एक पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतच स्पष्टीकरण दिलं. पक्ष नेतृत्वाकडून संशय व्यक्त केला जात असल्याने अपमानित होऊन राहण्यापेक्षा जाणं बरं असं म्हणत त्यांनी शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

    नेमकं काय म्हणाले प्रकाश पाटील

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना अनेकांनी साथ दिली. यामध्ये भिंवडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचाही सहभाग होता. त्यामध्ये माझा कोणताही सहभाग नसताना पक्ष नेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय घेत अविश्वास करण्यास सुरुवात केली. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपल्याला बाजूला करण्याचे प्रयत्न करण्यता येत आहे. त्यामुळे अपमानित होऊन राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रीया प्रकाश पाटील यांनी दिली.