आदित्य ठाकरेंच्या कपाळावर ‘मेरा बाप महागद्दार’ लिहा; शिंदे गटाच्या नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाषणामध्ये केलेल्या उल्लेखावरुन शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

    मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन राजकारणी एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाषणामध्ये केलेल्या उल्लेखावरुन शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

    ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या प्रचारामध्ये सामील झाल्या आहेत. आज त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये भाषण केले. मात्र प्रियंका चतुर्वेदी यांच्या या भाषणामुळे राजकारण रंगले आहे. भाषणामध्ये प्रियंका चतुर्वेदी “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असे त्या भाषणामध्ये म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या दिवार सिनेमाचा देखील उल्लेख केला. ‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

    भाषणाला प्रत्युत्तर देताना संजय निरुपम यांनी प्रियंका चतुर्वेदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या महिला खासदाराने एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल खूप अभद्र टिप्पणी केली. माझे वडील गद्दार आहेत, हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे. असं असेल, तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिल पाहिजे माझा बाप महा गद्दार आहे. कारण त्याच्या वडिलांनी भाजपासोबत युती तोडून गद्दारी केली” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेनेच्या महिला खासदाराने जे म्हटलं त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.

    ‘…तर हे दुकान बंद करेन’

    “मला काँग्रेससोबत जावं लागलं, तर हे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेब म्हणाले होते की, काँग्रेसचे लोक निंदक, नपुंसक, किन्नर आहेत. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मोठा गद्दारी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर माझे वडील मोठे गद्दार आहेत असे लिहावे. माझा पक्ष तुटला, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात. खरे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली आहे. आणि हिंदुत्वाच्या वाटेवर परत येऊन भाजपशी युती केली” असं संजय निरुपम म्हणाले.