उद्धव ठाकरेंना रामाची तर मोदींना रावणाची उपमा; संजय राऊतांचा घणाघात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना रामाशी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाची उपमा देत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

    नाशिक : अयोध्येमध्ये (Ayodhya) प्रभू श्री रामांच्या मंदिराचे दिमाखात उद्घाटन (Ram Mandir Inauguration) पार पडले. देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण असताना राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. मंदिर उद्घाटनानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तुलना रामाशी (Ram) तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाची उपमा देत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

    अयोध्या मंदिर उद्घाटनावरुन सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना संजय राऊत म्हणाले, “रामायण अयोध्येत कमी आणि पंचवटीत म्हणजेच महाराष्ट्रात जास्त घडलंय. प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे. मला तर वाटतंय की आता प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातात आता मशाल येईल. ते म्हणतात की, भाजपामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. आम्ही आमच्या रामाला पुजतो, तुम्ही तुमच्या विष्णूची पूजा करा. पण रामाचं धैर्य विष्णूमध्ये नाही”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

    पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संघर्षाची तुलना रामांच्या संघर्षाशी केली. राऊत म्हणाले, प्रभू श्री रामांवर अन्याय झाला तेव्हा त्यांनी कमी भडकवण्याचे प्रयत्न झाले असतील. पण त्या परिस्थितीतही राम शांत राहिला आणि संधीची वाट पाहत राहिला. तसेच उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट पाहात आहेत. रामासमोर एका बाजूला राज्याभिषेकाची तयारी चालू असताना दुसरीकडे वनवासाकडे जाण्याचे निर्देश आले. रामाचा तो संयम मी उद्धव ठाकरेंमध्ये पाहातो. त्यामुळे रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेजी, वेट अँड वॉच. आपलीही वेळ येईल”, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाची उपमा

    पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांची उपमा देताना संजय राऊत म्हणाले, “तेव्हा एकच रावण होता. पण आज गेल्या काही वर्षांत जागोजागी रावणच दिसतात. दिल्लीतला रावण, महाराष्ट्रातला रावण, नाशिकमधला रावण. आपल्याला वाटतं की आजचा रावण अजिंक्य आहे. नाही. तेव्हाचा रावणही अजिंक्य नव्हता. ते डोक्यातून काढा. सध्याचा रावणही अजिंक्य नाही. हनुमानानं रावणाच्या सभेत त्याचा अपमान यासाठी केला कारण त्यांना रावणाचा आत्मविश्वास तोडायचा होता. शत्रूचा आत्मविश्वास तोडायचा असतो. कोण भाजपा, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे? रावणाचा आत्मविश्वास तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला”, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जहरी टीका करत त्यांना रावणाची उपमा दिली. तसेच राज्यातील सत्ताधाऱ्यांना देखील धारेवर धरले.