‘अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत…’ संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच गौतम अदानी व भाजपा यांना देखील खेडबोल सुनावले आहेत.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय (Sanjay Raut) व राज्य सरकारवर (State Govt) निशाणा साधला आहे. तसेच गौतम अदानी व भाजपा (BJP) यांना देखील खेडबोल सुनावले आहेत. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग (Election Commission) या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

    खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा व अदानी यांचे निकटवर्तीय संबंध असल्याचा आरोप केला आहे. राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रकारे काल निकाल लावला त्यावरआम्ही काही टिप्पणी करायची नाही कारण आजही न्यायालयाचा निर्णय खाली मान घालून मान्य करायची प्रथा आहे, त्या निकालानंतर अदानी म्हणाले सत्याचा विजय होतो. या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो. अदानी श्रीमंत आहेत म्हणजे भाजप श्रीमंत आहे” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

    ‘घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे’ असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. भाजपा व शिंदे सरकार यांच्यावर देखील राऊत बरसले आहेत. राऊत म्हणाले, “काही राज्यकर्ते देशाला पाच हजार वर्ष मागे घेऊन जात आहेत. त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नसल्याने कुठल्या चिखलात लोळावे असे राज्य करत आहेत. त्यामुळेच देशात दहा वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढत आहेत यावर त्यांच्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे धर्म. फक्त धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.