तर दोन दिवस जेवू नका”, संतोष बांगर यांचा शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गजब सल्ला

बांगर यांनी एका शाळेमध्ये भेट देत यावेळी विद्यार्थ्यांना दोन दिवस न जेवण्याचा सल्ला दिला. आमदार संतोष बांगर यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये वादंग निर्माण झाला आहे.

    मुंबई : सध्या राज्यामध्ये लोकसभा (Lok Sabha Elections 2024) व विधानसभा निवडणूकीचे (Assembly Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. यामुळे सर्व खासदार व आमदार मतदारांच्या भेटीगाठी घेताना व बोलताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी प्रचारासाठी शाळेतील मुलांना वेठीस ठरल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या संतोष बांगर यांचे शाळेतील चिमुरड्यांना गजब आवाहन केले. बांगर यांनी एका शाळेमध्ये भेट देत यावेळी विद्यार्थ्यांना दोन दिवस न जेवण्याचा सल्ला दिला. आमदार संतोष बांगर यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये वादंग निर्माण झाला आहे.

    या व्हिडिओमध्ये आमदार संतोष बांगर विद्यार्थ्यांना म्हणत आहेत की, “तुमच्या आई-वडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करण्यास सांगा. नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका. तुम्ही जेवला नाहीत आणि आई-वडिलांनी विचारलं की तू जेवत का नाहीस? तर त्यांना सांगा की तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मी त्यानंतर जेवेन.” त्यानंतर संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना काय सांगणार? कोणाला मतदान करायला सांगणार?” या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून दोन ते तीन वेळा वदवून घेतले. आमदार संतोष बांगर शालेय विद्यार्थ्यांना हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी, शिक्षकवर्ग आणि बांगर यांचे कार्यकर्ते जोर जोरात हसत होते.

    सोशल मीडियावर संतोष बांगर यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. विरोधकांनी शालेय विद्यार्थ्यांना केलेल्या या आवाहनमुळे आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या अकाऊंटवर सदर व्हिडिओ शेअर करत संतोष बांगर यांना खडेबोल सुनावले आहे. “यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे!” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आमदार संतोष बांगर यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.