kalyan dispute

कल्याण ग्रामीणमधील आजदे परिसरात उद्धव ठाकरे गटातील शाखा प्रमुख मंगेश सरमळकर याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यावरुन या परिसरात राहणाऱ्या जयंता पाटील या समर्थकाने आक्षेप घेतला होता.

    अमजद खान, कल्याण: कल्याण (Kalyan) ग्रामीणमधील आजदे पाडा परिसरात सोशल मीडियावरील पोस्टवरून वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाला शिंदे गटातील (Shinde Group) कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली आाहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाला नामोहरम करण्याचे सत्र सुरुच आहे.

    कल्याण ग्रामीणमधील आजदे परिसरात उद्धव ठाकरे गटातील शाखा प्रमुख मंगेश सरमळकर याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. (ही पोस्ट आता डिलीट करण्यात आली आहे) यावरुन या परिसरात राहणाऱ्या जयंता पाटील या समर्थकाने आक्षेप घेतला होता. पाटील हे शिंदे गटातील पदाधिकारी आहेत. सोशल मिडियावरील वादाचा आकस ठेवून जयंता पाटील समर्थकांनी गुरुवारी सकाळी मंगेश सरमळकर यांच्याशी वाद घातला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांची कॉलर पकडली आणि शिविगाळ केली. या प्रकरणात मंगेश याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    मंगेश यांच्या विरोधातही वाद घातल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यापुढे हा प्रकार होऊ नये त्यासाठी दोघांना समज देण्यात आली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील वाद सुरुच असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. राज्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे गटात सामील झाले. मात्र ठाकरे गटात देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत जे स्वतःला निष्ठावान शिवसैनिक मानतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात आणण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जाते. कल्याण पूर्व भागातील हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेत दोन्ही गटात राडा झाला. हा वाद आता कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.