palghar zilla parishad

पालघर जिल्हा (Palghar)अध्यक्षपदासाठी शिंदे गटाने खेळलेली खेळी यशस्वी ठरल्याने भाजप, बहुजन विकास आघाडी यांच्या सदस्य संख्येच्या जोरावर ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या सदस्य संख्येच्या बहुमताच्या जोरावर शिंदे गटाचा अध्यक्ष बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

    संतोष चुरी,पालघर: अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे (Shivsena Shinde Group) सदस्य काबीज करण्यात यश मिळवल्याने त्या सदस्य संख्येसह भाजप (BJP) व बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन पालघर (Palghar) जिल्हा अध्यक्ष पदावर शिंदे गटाचा चेहरा समोर येणार असल्याचे बहुधा निश्चित आहे. त्यामुळे अखेर अध्यक्ष पदाबाबतच्या राजकीय खलबतांवर अखेर पडदा पडला आहे.

    अखेर अध्यक्षपदासाठी शिंदे गटाने खेळलेली खेळी यशस्वी ठरल्याने भाजप, बहुजन विकास आघाडी यांच्या सदस्य संख्येच्या जोरावर ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या सदस्य संख्येच्या बहुमताच्या जोरावर शिंदे गटाचा अध्यक्ष बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र विरोध असलेल्या या गटाच्या अध्यक्षपदाच्या दावेदाराला जिल्हा स्वीकारेल का हे येता काळच ठरवणार असल्याची चर्चा आहे.

    अध्यक्षपदासाठी मोखाड्यातील प्रकाश निकम यांचा दावा राहणार आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी भाजप उत्सुक असल्याचे समजते. अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेल्या अनेक दिवसापासून पालघर जिल्ह्यात राजकीय खलबते सुरू होती. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे बहुमत असल्यामुळे ठाकरे गट पुन्हा आपली सत्ता स्थापन करेल असे दिसत असताना अचानकपणे शिंदे गटाने या खलबतामध्ये उडी घेऊन ठाकरे गटाचे सदस्य आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नची पराकाष्टा केली. तसेच काही सदस्य पळवल्याचे आरोप होत होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बहुमत व वर्चस्व सिद्ध करावे या हेतूने ठाकरे गटातील बहुसंख्य सदस्य शिंदे गटाकडे आणण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे. शिंदे गटाचा सदस्य हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणानंतर शिंदे गटाचे अध्यक्ष बनला तर त्याला किती प्रतिसाद मिळेल हा येणारा काळ ठरवेल.

    ठाकरे गटातील जिल्हा परिषद अध्यक्षांनीही शिंदे गटाच्या रस्ता धरल्याने तसेच ठाकरे गटाचे बहुसंख्य सदस्य शिंदे गटाकडे गेल्याने राज्यातील राजकारणा सारखे नाट्यमय राजकारण पालघरमध्ये ही घडणार आहे. ठाकरे गटाचे बहुतांश सदस्य शिंदे गटाकडे आल्याने हा गट म्हणजेच आमची शिवसेना असा दावा शिंदे गट करेल व मताधिक्याचा जोरावर अध्यक्षपद मिळवेल असे दिसते. मात्र पक्षविरोधी मतदान केल्यामुळे शिंदे गटाकडे वळलेले ठाकरे सदस्य यांना पक्षांतर बंदी किंवा पक्ष विरोधी मतदान केल्याचा कायदा हा ठाकरे गटाने अवलंबल्यास राज्यात ज्याप्रमाणे शिवसेना विरुद्ध शिवसेना राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तसे राजकारण पालघरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदमधील ठाकरे गटाचे सदस्य शिंदे गटाकडे आल्याने हे सदस्य हीच आमची मूळ शिवसेना असा दावा शिंदे गट करू शकतात. असे असले तरी आता मतदान करून बहुमत सिद्ध करून शिंदे गट अध्यक्ष बसवतील व सदस्य वर्गासाठी पुढील वादविवाद सुरू ठेवतील असे एकंदरीत दिसून येत आहे.

    या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्या निवडणूक पार पडत आहे ठाकरे गटाचे सदस्य जरी शिंदे गटाकडे गेले असले तरी त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून मतदान करणे आवश्यक होते. मात्र त्यांची भूमिका आज दुपारपर्यंत गुलदस्तातच होती.

    कुठल्याही प्रकारचा गट फुटीर सदस्यांनी स्थापन केला नसल्याने ते ठाकरे गताचेच सदस्य राहतील असे अपेक्षित आहे.त्यामुळे त्यांनी पक्ष विरोधी कृती केली तर त्यांवर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. जर फुटीर सदस्यनी पक्ष विरोधी कृती किंवा मतदान केले तर त्यांच्यावर ठाकरे गट काय कारवाई करते किंवा काय पाऊल उचलेल हे येत्या काळात पाहावे लागणार आहे.

    अध्यक्षपदाच्या दावेदार मानला जाणाऱ्या प्रकाश निकम यांना अनेक वेळा खस्ता खाव्या लागल्या आहेत उपाध्यक्षाच्या पंक्तीमध्ये अनेक वेळा नाव चर्चेत असल्यानंतरही त्यांना या खुर्ची पासून अलिप्त रहावे लागले मात्र आता शिंदे गट त्यांचे स्वप्न साकार करत असल्याने ते या पदावर विराजमान झाल्यानंतर गतिमान सरकार प्रमाणे गतिमान जिल्हा परिषद करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.