महायुतीत फुट? भुजबळांची हकालपट्टी करा, शिंदे गटातील ‘या’ दोन नेत्यांची मागणी

आरक्षणावरुन राज्य सरकारमधील घटकपक्षांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले असून शिंदे गटातील नेत्यांनी छगन भुजबळ यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्य सरकारमध्य़े (State Govt) देखील फुट पडली असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे आपल्या भाषणामध्ये बोलत आहेत तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसी (OBC) समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका मांडत आहे. त्यामुळे आरक्षणावरुन राज्य सरकारमधील घटकपक्षांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले असून शिंदे गटातील नेत्यांनी छगन भुजबळ यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

    महायुती सरकारने यांनी मराठा व ओबीसी समाजावर अन्याय न करता सुवर्णमध्ये काढल्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. मात्र प्रत्यक्षामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये या निर्णयावर एकमत नसून विरोध असल्याचे दिसून येत आहे. ओबीसी समाजासाठी भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शिंदे गट मात्र त्यांच्या या भूमिकेवर नाराज आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी उघड करत छगन भुजबळांवर टीका केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, “छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”,असा गंभीर आरोप करत आमदार गायकवाड यांनी भुजबळांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाही. असा इशारा देखील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

    त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील भुजबळांवर निशाणा साधला. संजय गायकवाड यांचे वक्तव्य वैयक्तिक असले तरी मराठा आरक्षण आणि ओबीसी यांचा विषय वेगळा आहे. काही लोक राजकारण करण्यासाठी एखाद्या समाजाची ढाल घेत आहेत. अशा राजकारणामुळे दोन्ही समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे. पत्रकार परिषद घेऊन जर सरकारवरच आरोप केले जात असतील तर त्यांचा राजीनामा मागून काहीही चुकीचे झाले नाही. अशा शब्दांत संजय गायकवाड यांच्या भूमिकेला संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे.