आमदार संजय गायकवाड म्हणाले, “युवकास मारहाणीचा पश्चाताप नाही, ती तर भूषणावह बाब!”

तरुणाला बेदम चोपणाऱ्या आमदार गायकवाड यांनी ही बाब भूषणावह असून यासाठी कोणाताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले.

    बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणूकीमध्ये तरुणाला मारहाण केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेच्या वर्तुळामध्ये असणारे संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणाला बेदम चोपणाऱ्या आमदार गायकवाड यांनी ही बाब भूषणावह असून यासाठी कोणाताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले.

    आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधत तरुणाला मारल्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, “बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती. मात्र, पोलिसांना मिरवणुकीत ते गवसले नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले. त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. माताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते. यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह बाब आहे. यापुढेही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच,” अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

    काही दिवसांपूर्वी गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात असल्याची बाब सांगणे देखील संजय गायकवाड यांना महागात पडले होते. यावर देखील गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. संजय गायकवाड म्हणाले, “मी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाने गुन्हा दाखल केला, माझ्या गळ्यातील कथित वाघ दंत जप्त केला. मात्र तो दात प्लास्टिकचा असल्याचा दावा करून प्रथमदर्शनी तसे आढळून आल्याचे’ देखील आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.