अंबादास दानवेंनी शेअर केले शिंदेंचे जुने ट्वीट; ‘एबी फॉर्म घेताना घराणेशाही नाही का दिसली?’  

एकनाथ शिंदे यांचा एबी फॉर्म भरताना फोटो शेअर करत एबी फॉर्म घेताना घराणेशाही आठवली नाही का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला.

  मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय (MLA Disqualification Case) लागल्यानंतर ठाकरे गट (Thackeray group) आक्रमक झाला असून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा एबी फॉर्म भरताना फोटो शेअर करत एबी फॉर्म घेताना घराणेशाही आठवली नाही का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला.

  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (दि.10) शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. या निर्णयानंतर सत्ताधाऱ्यांनी सत्याचा विजय झाला या आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ‘आजच्या निर्णयाने घराणेशाही संपली’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर आता अंबादास दानवे यांनी जुने ट्वीट शेअर करत टोला लगावला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा एबी फॉर्म स्वीकारतानाचा फोटो आहे. यो पोस्टमध्ये अंबादास दानवे म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांना 2019 साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का?”, अशी खोचक शब्दांमध्ये टीका केली. यामध्ये ‘हुडी घालून आलेला माणूस’ असे विशेषण देत दानवे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना देखील सुनावले आहे.

  ही पोस्ट शेअर करताना यामध्ये एकनाथ शिंदे यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी एबी फॉर्म स्वीकारतानाचा फोटो आहे. यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देत आहेत. अंबादास दानवेंसह शिवसेनेच्या अधिकृत पेजने देखील हा ट्वीट शेअर करत “जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं? आता हे ट्विट डिलीट करू नका!” असा टोला लगावला.

  निर्णयानंतर काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

  “आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच‌ चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे.”